नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणेंचे मंत्रिपद जाणार असल्याचे सांगतानाच राज ठाकरे हे भाजप पुरस्कृत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नारायण राणेंवर आसूड
राऊत म्हणाले की, वेळ बदलत असतो आमचं देखील वेळ येईल. हे सगळे (शिंदे गटातील नेते) भाजपात जाणार कारण ते अपात्र ठरणार. फक्त आजचे मरण उद्यावर ढकलत आहेत. कायद्याप्रमणे हे १६ आमदार अपात्र ठरतील आणि नाही ठरले तर तो कायद्याचे सर्वात मोठा आपमान ठरेल. मी नारायण राणेंना कधीच भेटलो नाही मी आताच उद्धव ठाकरे यांच्याशी याविषयी बोललो. खरं तर सुरुवात कोणी केली हे तपासून पहायला हवे. मी घाबरत नाही. तू कधी रस्त्यावर उतरला असा प्रश्न उपस्थित करीत राऊतांनी राणेंचा पुन्हा एकेरी उल्लेख केला. राणेचं मंत्रिपद जाणार आहे. राणेने कधी एक तरी थोबाडीत खाल्लीय का, असा सवालही राऊतांनी यावेळी विचारला.
राज ठाकरेंवर गरजले
राज ठाकरे यांची आज मुंबईत सभा होत आहे त्याविषयी राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे भाजपचे पुरस्कृत आहेत. त्यामुळे त्यांना सभा घेण्यासाठी परवानगी मिळेलच, असा टोलाही त्यांनी लगावला.
डबक्यात बेडूक राहतात
राऊत म्हणाले की, शिवसेना सोडून जे गेले त्यांचा डीएनए तपासून पाहण्याची गरज आहे. ४० वर्षे आंदोलन करणारी पिढी बदलतं गेली मात्र आंदोलनं सुरू आहे. कुणालाही उचलून तुरुंगात टाकायचं, काय बापाचं राज्य आहे का? सुडाचे राजकारण आम्ही कधीही केलं नाही. हे सरकार सूड बुद्धीने काम करतंय. पक्ष सोडून ज्या गटात गेलेत, ते डबके आहे. डबक्यात बेडूक राहतात, आता डराव डराव करतायत. मात्र ते अपात्र ठरतील. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. शिवसेना एकच आहे एकच राहील, हे गट तट तात्पुरते. शिवसेना वटवृक्ष, बाळासाहेबांची शिवसेना नावाचा वटवृक्ष लावला. आता या वृक्षाचे पालापाचोळा खाली पडतो. काही लोक कचरा उचलून मुख्यमंत्र्यांसमोर नेताय. काही लोक सोडून गेले, तरी डॅमेज नाही. डॅमेज कंट्रोलचा काहीच विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shivsena MP Sanjay Raut on Raj Thackeray and Narayan Rane
Politics Nashik Critic