मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार असल्याने सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली आहे. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शहांच्या सासूरवाडीला म्हणजेच कोल्हापूरला बसत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत असून अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही, असे बोम्मई म्हणत आहेत. पण आम्ही म्हणतो, अमित शाहांना भेटून फायदा आहे. कारण सीमाभाग केंद्रशासित करण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय घेत असते. सीमाभागात धुडगूस सुरु असून त्याठिकाणी राज्यातील फौजफाटा काढून केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे.
मराठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाखाली येतो, त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहे. सीमाभागातील मराठी भागावर अन्याय होतोय, चिरडलं जातंय, भरडलं जात आहे. संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, सीमाभागाचे सर्वाधिक चटके त्यांची सासूरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष कोल्हापुरात होतो, त्यामुळे या प्रकरणात सर्वात जास्त माहिती त्यांना आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने सीमाभागात हस्तक्षेप करायचा नाही का, संसदेनं बोलायचं नाही का, न्यायालय राम मंदिराची सलग सुनावणी करून प्रश्न सोडवू शकतो, पण २० ते २५ लाख मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मात्र तारखेवर तारीख मिळत आहे. सरकारच्या इंटरेस्टचे विषय न्यायालयात सुटतात, पण सीमाभाग असेल, राज्यातील बेकायदेशीर सरकार असेल, त्याबाबत मात्र तारखा पडताहेत. म्हणून लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतून काही चांगल निघणार असेल, तर आम्ही स्वागत करतो, असेही संजय राऊत म्हणाले.
Shivsena MP Sanjay Raut on Amit Shah Border Issue
Maharashtra Karnataka Border Issue Kolhapur