नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईडीकडून अटक अन् त्यांनतर जमीन मिळालेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. बारा माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा बघता राऊत यांच्या दौऱ्यात संबंधितांची मनधरणी केली जाणार असल्याचेही सांगितले जाते. म्हणजेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी राऊत यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शिंदे गटात जाण्यासाठी तयार असलेले शिवसेनेचे बारा माजी नगरसेवक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. राऊत यांच्यासमोर कैफियत मांडून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूर आहे. प्रभागात आपल्या विरोधात पर्याय निर्माण केला जात असून पाठबळ दिले जात असल्याचा या माजी नगरसेवकांचा आरोप आहे. हर्षदा गायकर यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने लावलेल्या फलकावर शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांची छबी झळकली होती. त्यावरून त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चाना उधाण आले होते. सोमवारी (दि.२८) या बारा माजी नगरसेवकांचा प्रवेश होईल, असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र या बारा माजी नगरसेवकांचा प्रवेश हुकला. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
या बारा नगरसेवकांचे मन वळविण्यासाठी सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यांनी या सगळ्यांचीच नाराजीचे कारण जाणून घेतले. संबंधितांचा गटातील प्रवेश तूर्त थांबण्यामागे हेही प्रमुख कारण सांगितले जाते. त्यातच राऊत येत्या १ डिसेम्बरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. २ डिसेंबरला ते पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा करणार आहेत. त्यानंतर मेळावाही घेणार आहेत. राऊत दौऱ्यावर येत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राऊत संबंधित बारा नागरसेवकांशी चर्चा करून मनधरणी करणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात त्यांची मनधरणी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.
Shivsena MP Sanjay Raut Nashik Tour Politics