मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शनिवारी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मलाही गुवाहाटीला जाण्याची ऑफर आली होती. पण मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतो म्हणून मी तिथे गेलो नाही. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने आहे, तेव्हा भीती कशाला?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्कामाला होते. या हॉटेलच्या ७० खोल्या शिवसेनेच्या बंडखोरांसाठी बुक करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी, हॉटेलचे रेस्टॉरंट, मेजवानी आणि अन्य सुविधा बाहेरील व्यक्तींसाठी २२ ते २९ जून या कालावधीत बंदी घालण्यात आली होती.
संजय राऊत म्हणाले की, “देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून, खासदार म्हणून, देशाची कोणतीही तपास यंत्रणा जेव्हा मला फोन करेल तेव्हा मी त्यांच्यासमोर जाऊन म्हणणे मांडले पाहिजे, हे माझे कर्तव्य आहे. मला बोलावण्यात आले. लोकांच्या मनात शंका आहे की राजकीय दबावाखाली हे घडले, असे काही नाही.”
मनी लाँड्रिंग प्रकरणी राऊत हे शुक्रवारी ईडीसमोर हजर झाले. तब्बल १० तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते कार्यालया बाहेर आले. ते म्हणाले की, त्यांच्या मनात शंका होती की चौकशीसाठी हेच टायमिंग का ठेवले. मी १० तास त्यांच्यासोबत राहिलो, अधिकाऱ्यांनी मला खूप छान वागणूक दिली. मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मी त्यांना म्हणालो की मी परत यावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा येईन.
मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण आहे. तसेच, राऊत यांच्या पत्नी आणि मित्रांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीने राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने राऊत यांना २८ जून रोजी समन्स बजावले होते. पक्षाच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडी समन्सला राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यापासून रोखण्याचा कट असल्याचे म्हटले होते.
Shivsena MP Sanjay Raut Guwahati Rebel MLA Offer Politics ED Enquiry