मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेतून शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल १ कोटी रुपये मिळाल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. यासंदर्भात ईडीने विशेष न्यायालयाला ही माहिती दिली आहे. विशेष पीएमएलए (मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा) न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची मागणी करताना ईडीने हा दावा केला आहे. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील अनियमितता आणि आर्थिक मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित आहे. ज्यामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांच्या कथित साथीदारांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी मात्र आपल्यावरील आरोप अस्पष्ट असून ते राजकीय सूडबुद्धीने लावण्यात आल्याचा दावा केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राऊत यांना अटक झाली. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात सहा तासांपेक्षा जास्त काळ त्यांची चौकशी केल्यानंतर ही अटक करण्यात आली.
ईडीने राऊतांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले आणि आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र न्यायमूर्तींनी बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आठ दिवसांच्या कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली तर ती पुरेशी ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर म्हणाले की, राऊत यांनी त्यांच्या घरी सापडलेल्या 11 लाख रुपयांच्या स्त्रोताबाबत ईडीला माहिती द्यावी. “प्रत्येकजण घरी योग्य प्रमाणात रोकड ठेवतो. आम्ही पाहिले आहे की, तुम्ही प्रवास करताना दोन लाख रुपये रोख घेऊन जाऊ शकता. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम असल्यास ती रक्कम कोणत्या बँकेतून काढण्यात आली हे नमूद करावे लागते. आता राऊत यांना सर्व काही माहिती द्यावी लागेल.
Shivsena MP Sanjay Raut Family 1 crore ED Enquiry Claim Enforcement Directorate