मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन परतताच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. हा योगायोग आहे की अन्य काही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचनिमित्ताने चर्चांना उधाणही आले आहे. याप्रकरणी विविध मतमतांतरेही व्यक्त केली जात आहेत.
शिंदे यांनी वारंवार संजय राऊत यांच्यावर विविध प्रकारचे आरोप यापूर्वीच केले आहेत. राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचे शिंदेसह त्यांच्या गटातील आमदारांचे म्हणणे आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे रविवारी तातडीने दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दाखल झाले. गृहमंत्री अमित शहा यांची शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतली. अनेक तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर पहाटे ४ वाजता शिंदे हे औरंगाबादमध्ये परतले आहेत. शिंदे महाराष्ट्रात परतताच काही तासांनी ईडीचे पथक मुंबईतील राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे हा योगायोग आहे की षडयंत्र असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Shivsena MP Sanjay Raut ED Raid Eknath Shinde Delhi Tour Coincidence or Other