मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीने राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथील काही भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. तशी नोटिस ईडीने राऊत यांना पाठविल्याचे सांगितले जात आहे. अद्याप राऊत कुटुंबियांनी यासंदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आज राऊत यांच्यावरील कारवाईची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही ईडीने संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी यांना चौकशीची नोटीस पाठवली होती. दोघांचीही अनेक तास चौकशीही झाली होती. राऊत यांचा दादर येथील फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्याशी संजय राऊत यांचे निकटचे संबंध आहेत. त्याचअंतर्गत ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यासह ईडी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ईडीने यापूर्वी शिवसेना नेत्यांची चौकशी केली आहे. तर, काही नेत्यांची संपत्तीही जप्त केली आहे. आता राऊत यांची संपत्ती जप्त झाली आहे.