मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राऊत यांना येत्या ८ ऑगस्टपर्यंत कोठडी रहावे लागणार आहे. त्यातच ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणात आता ईडीला मोठा सुगावा लागला आहे. झडतीदरम्यान ईडीला संजय राऊतांच्या घरातून एक डायरी सापडली आहे. ही डायरी मनी लाँड्रिंग प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकते, असा दावा ईडीने केला आहे. ज्यांना पैसे देण्यात आले त्यांची नावे या डायरीत कोडवर्डमध्ये नमूद केले असल्याचे ईडीला आढळून आले आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळा मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना रविवारी अटक केली. तत्पूर्वी त्यांच्या घराची कसून झडती घेण्यात आली. राऊत यांचीही सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. संजय राऊत यांच्या घरातून तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ईडीने एक डायरीही जप्त केली आहे. जप्त केलेल्या डायरीतील कोडवर्डमध्ये काही महत्त्वाची माहिती ईडीला आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे कोणाला दिले याचा उल्लेख कोडवर्डमध्ये असल्याचा ईडीचा दावा आहे.
संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्याच घरातून पुरावे सापडल्याचा दावा ईडीने केला आहे. यासंदर्भात ईडीकडे एक डायरी आहे. संजय राऊत यांच्या खोलीतून ईडीने ही डायरी जप्त केली आहे. त्यात काही लोकांची नावे कोडवर्डमध्ये आहेत. ज्यांना १ कोटी १७ लाख रोख देण्यात आले. हे पैसे का दिले, कोण आहेत हे लोक? या नावांचा या कोडचा अर्थ काय? याबाबत ईडीने चौकशी केली असता संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर केले असता ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पुराव्याच्या आधारे ईडीने डायरीचा संदर्भ दिला. या प्रकरणात आता राऊत यांच्या घरी सापडलेली डायरी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. पत्रा चाळ घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर येथे पेमेंट करण्यासाठी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने दावा केला आहे की, डायरीत लोकांची नावे कोणाला कळू नयेत म्हणून कोडखाली लिहिली आहेत. ईडी आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पात्रा चाळचा पुनर्विकास प्रकल्प २००८ मध्ये सुरू झाला. मुंबईतील गोरेगावमधील ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डर्ससोबत करार केला. म्हाडा, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आणि रहिवाशांमध्ये करार झाला. एकूण १३ एकर जागेपैकी साडेचार एकर मूळ रहिवाशांना विकून उर्वरित जमीन म्हाडा आणि बिल्डरद्वारे बांधली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. मात्र, बिल्डर गुरु आशिष आणि अधिकाऱ्यांनी ही जागा एका खासगी बिल्डरला विकल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात गुरु आशिष कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.
Shivsena MP Sanjay Raut ED Got Dairy Evidence