नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्याप्रकरणी जामिन मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत प्रथमच दिल्लीत दाखल झाले आहेत. लवकरच अमित शहा, नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं राऊत यांनी जामिन मिळाल्यानंतर सांगितलं होतं. त्यानंतर आज २२ नोव्हेंबर रोजी ते दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुंबईत गेल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांना भेटेन. पण लपून वगैरे भेटणार नाही, तुम्हाला सांगून भेटेल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांना दिली. मात्र आता मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत आलो असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच मला तुरुंग प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या गृहमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायच्या आहेत. जेलमध्ये असताना मी काही अभ्यास केला आहे, त्यातील नेमके मुद्दे घेऊन मी फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षातले असलो तरी आम्ही सहकारी आहोत. मी खासदार आहे. त्यामुळे आम्ही कधीही भेटू शकतो. असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सगळे पळपुटे नसतात..
ईडीच्या आरोपांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, अन्याय, असत्याविरोधात लढायचं असेल तर त्याची मानसिक तयारी आमची आहे. सगळेच काही पळकुटे नसतात. काही लढणारेदेखील असतात. म्हणून महाराष्ट्र टिकून राहिला आहे. देशात स्वातंत्र्याची मशाल पेटत राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत म्हणाले.
शिंदे यांना टोला..
सीमा प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शिंदे यांना टोला मारला. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हेसुद्धा युती शासनाच्या काळात बेळगावसंदर्भात विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटीलही होते. पण हे दोन्ही मंत्री किती वेळा बेळगावात गेले… मी वारंवार त्यांना जा असं सांगत होतो, आता तुम्ही असे काय दिवे लावणार आहात, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
Shivsena MP Sanjay Raut Delhi Visit After Bail
Politics