मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मनी लाँड्रिग प्रकरणात ते सध्या तुरुंगामध्ये आहेत. आज त्यांची कोठडी संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आता राऊत यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा तुरुंगातच राहणार आहेत.
पत्रा चाळ प्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली आहे. त्यांच्या खात्यात आलेले १ कोटी रुपये तसेच त्यांचे बांधकाम व्यावसायिक प्रवीण राऊतशी असलेले संबंध याची चौकशी करण्यासाठी त्यांना आणखी कोठडीची मागणी करण्यात आली. शिवाय राऊत यांच्या घरी ईडीला एक डायरी सापडली. त्यात विविध प्रकारचे उल्लेख आहेत. खासकरुन ज्यांना पैसे दिले त्यांचे कोडवर्डमध्ये उल्लेख असल्याचा दावा ईडीने केला आहे. न्यायालयाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले होते. ही कोठडी संपल्याने राऊत यांना आज पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. राऊत यांची आणखी चौकशी करायची असल्याने ईडीने कोठडीची मागणी केली. त्यास न्यायालयाने मान्यता दिली. आता राऊत यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Shivsena MP Sanjay Raut Custody Court
ED Patra Chawl Scam Money Laundering