मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेने पुन्हा एकदा बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राबाहेर असलेल्या बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्यांना शिवसेनेने युती सोडावी असे वाटते. त्यांनी मुंबईत यावे. हिम्मत करून इथे या आणि एकत्र बसून बोला. इथे येऊन बोला, शिवसेनाही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, असे राऊत यांनी जाहीर केले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी परततील याची आम्हाला खात्री आहे. आमच्या आमदारांचे अपहरण झाले आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांपैकी २१ आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना परत यायचे आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुरत येथील एकनाथ शिंदे गटामधून बाहेर पडलेले नितीन देशमुख म्हणाले की, यापूर्वीही अनेकदा सरकार पाडण्याचे कारस्थान झाले आहे. काही लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. सरकारमध्ये पटत नसेल तर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा होता. मात्र येथे बोलण्याऐवजी ते काही आमदारांसह पळून गेले. सेनेचे दुसरे आमदार कैलास पाटील म्हणाले की, मला सूरतमध्ये ठेवण्यात आले होते.
शिंदे गटाचा नवा व्हिडिओ
एकनाथ शिंदे गटानेही व्हिडिओ जारी करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओत एकूण ४२ आमदार दिसत आहेत. ‘एकनाथ शिंदे संघर्ष करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ अशा घोषणा देत ताकद दाखवत आहेत. एवढ्या मोठ्या बंडखोरीनंतरही शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासाठी कठोर शब्द वापरले जात नाहीत. यावरून शिवसेनेची भूमिका मवाळ असून त्यांना एकनाथ शिंदे गटाला कसे तरी पटवून द्यायचे आहे, हे स्पष्ट होते.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
या संकटामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. आज राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत. बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला फारशी माहिती नाही. काल संध्याकाळी पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करू. याशिवाय सत्तेबाहेर राहण्यासाठी संघर्षासाठी तयार राहा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
shivsena mp sanjay raut announcement maharashtra political crisis