मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची लॉटरी लागली आहे. कारण, शिवसेनेने त्यांना सलग चौथ्यांदा खासदारकीचे तिकीट दिले आहे. येत्या २६ मे रोजी ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राऊत हे सलग चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार झाल्यास आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे.
राऊत हे सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. आता त्यांची खासदारकीची टर्म यंदा संपत आहे. होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा राऊत यांनाच संधी दिली आहे. त्यामुळे एखाद्या प्रादेशिक राजकीय पक्षाकडून सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. राऊत हे अतिशय आक्रमकपणे त्यांचे मुद्दे मांडतात. पक्षाची बाजू ते लावून धरतात. खासकरुन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्यावर अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठीही त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्यांचे सेनेतील महत्त्व अधिकच वाढले आहे. परिणामी त्यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट देण्यात आले आहे.
२००४ मध्ये राऊत यांना सर्वप्रथम राज्यसभेवर पाठवले होते. तेव्हापासून ते सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत. आता चौथ्यांदा ते पुन्हा खासदार होणार आहेत. ते निवडून येतील एवढी मते सेनेकडे आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग निवडून जाण्याचा विक्रम काँग्रेसच्या सरोज खापर्डे यांच्या नावावर आहे. त्या सलग २८ वर्षे (१९७२ ते २०००) खासदार होत्या. इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. आता राऊतही त्यांचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहेत.