मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जादू चालली असून चार राज्यांत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत आलेल्या निकाल आणि ट्रेंडमध्ये यूपीसह उत्तराखंड आणि गोवा तसेच मणिपूरमध्येही भाजपचे पुनरागमन दिसून येत आहे. चार राज्यांतील भाजपच्या विजयाच्या ट्रेंडवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. भाजपचा हा विजय निवडणूक व्यवस्थापनाचा विजय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. खरे म्हणजे आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. पंजाबमधील नागरिकांना दुसरा पर्याय मिळाला आणि त्यांनी ‘आप’ची निवड केली. तसेच भाजपचा विजय हा त्यांच्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे.
राऊत पुढे म्हणाले, ‘ आप पक्षाने पंजाब राज्यात विजय मिळवला त्याचे आमच्या पक्षाच्या वतीने मी अभिनंदन करतो, मात्र काँग्रेसचा वाईट पराभव झाला आहे, गोवा-उत्तराखंडमध्ये ते जिंकतील अशी अपेक्षा होती, पण त्यांचा पराभव झाला. युपीत अखिलेश आणि त्यांच्या मित्र पक्षाकडूनही अपेक्षा होत्या पण त्यांची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. निवडणूक निकालांमध्ये भाजपने ४ राज्यात दणदणीत विजय मिळविला आहे. म्हणजेच या चारही ठिकाणी भाजपचे बहुमत असून तेथे आता सत्ता स्थापन होणार आहे. तर, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बहुमत मिळविले आहे.