इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, काल राज यांनी हाच व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, आपण शेअर करीत असलेला व्हिडिओ खरा असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांचा हा व्हिडिओ दसरा मेळाव्याचा आहे. राज यांनी शेअर केलेला व्हिडिओ ३६ सेकंदांचा आहे. तर, प्रियंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा १ मिनिटे १४ सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शेजारीच उद्धव ठाकरे हे बसलेले आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करीत असल्याने बाळासाहेबांनी त्याचा चांगलाच समाचार या व्हिडिओ मध्ये घेतला आहे. या व्हिडिओ शेअर करताना प्रियंका यांनी म्हटले आहे की, “हा खरा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नक्कल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल नव्हे तर अनेक पावले मागे असतात.
या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत की, मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमची शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता.
या व्हिडिओद्वारे प्रियंका यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये व्हायरल झाला आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/priyankac19/status/1521920559076212736?s=20&t=ko8VW86-BPPM6GJPu1PMdA