नाशिक – नांदगाव विधानसभेचे शिवसेना आमदार सुहास कांदे हे थोड्याच वेळात मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत त्यांच्यात आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात मोठा वाद सुरू आहे. जिल्हा नियोजन विभागाचा निधी भुजबळांनी हडपल्याचा आरोप करीत कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीही नांदगाव येथील बैठकीत कांदे आणि भुजबळ यांच्या जोरदार खडाजंगी झाली होती. त्यातच कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचे पत्र आले आहे. भुजबळांविरोधातील तक्रार मागे घ्या, असे त्यात म्हटल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. याप्रकरणी कांदे यांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे रितसर तक्रार केली आहे. त्यानंतर भुजबळ यांनीही आक्रमकपणे प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत कांदे यांनी या सर्व प्रकरणात माध्यमांसमोर सर्व बाजू स्पष्टपणे मांडलेली नाही. मात्र, आज दुपारी अडीच वाजता ते शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींंचा सविस्तरपणे खुलासा करणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत आपल्याकडे ५०० पुरावे असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. त्यामुळे आता कांदे हे काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.