मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज शिवसेनेला दुसरा मोठा दणका दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शालक तसेच सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीकांत पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यांच्या जवळपास ७ कोटींच्या सदनिका सील केल्या. त्यानंतर आता ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज मोठी कारवाई केली आहे. सरनाईक यांची तब्बल सव्वा ११ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
आजच्या कारवाईबाबत सूत्रांनी सांगितले आहे की, ईडीने वारंवार सरनाईक यांना समन्स बजावले. पण, ते चौकशीला हजर झाले नाहीत. कुठलीही माहिती दिली नाही. एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात ठाण्यातील दोन फ्लॅटचा समावेश आहे. एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ईडीची ही कारवाई सुडबुद्धीने आणि शिवसेना नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी असल्याचा आरोप सेना नेत्यांकडून होत आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयावर गेल्या वर्षी ईडीने छापा टाकला होता. प्रताप यांचे पुत्र पुर्वेश आणि विहंग यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीचे पथकाने विहंग यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन तेथे त्यांची चौकशी केली होती. सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्याचे आमदार आहेत. टॉप ग्रुपशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून सरनाईक यांच्यावर छापे टाकण्यात आले.
ईडीचे छापे आणि चौकशीनंतर सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या पत्रात सरनाईक यांनी लिहिले होते की, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा शिवसेने भाजपसोबत युती करावी. तसे केले तर शिवसेनेला फायदा होईल. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत असल्याचे नमूद केले. सरनाईक यांनी १० जून रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यात अनेक मुद्दे उपस्थितीत केल्यामुळे हा लेटरबाँम्ब चर्चेचा विषय ठरला होता.