मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशारा देत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. तेथील घडामोडींना लक्ष्य करत त्यांनी हे आरोप केले आहेत.
अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. देशमुख यावेळी म्हणाले,“पाच दिवसांपूर्वी माझ्याविरोधात लाचलुपत विभागाची चौकशी लावण्यात आली. पोलीस महानिरीक्षकांनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटा असं मला सांगितलं. आपल्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) चौकशी लावायला हवी. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल,” असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला.
शिवाय,“माझ्याविरोधात कारवाई केलीच तर माझ्याकडेही अनेक व्हिडीओ आहेत, जे मी उघड करेन. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं आहे, हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ५० खोके एकदम ओकेचं षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याचा दावाही त्यांनी या मेळाव्यात बोलताना केला आहे.
नारायण राणेंवर निशाणा
नारायण राणे शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हणत असल्याचे समोर आले होते. पण जर बारकाईने पाहिलं तर त्यांच्या डोक्यावर खोटे केस आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी डुप्लिकेट केस लावावे वाटतात याची तुम्हाला जरा लाज वाटू द्या. तुमच्या आमदाराकडे अंगरक्षक तरी आहेत, उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे अंगरक्षक नाहीत, अशी टीकाही नितीन देशमुख यांनी केली आहे.
Shivsena MLA Nitin Deshmukh Video Threat