मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात आमदार अॅड. परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा, पर्यावरणाचे नियम न पाळणे असा आरोप परब यांच्यावर करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे आहे. त्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. तसेच, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच या रिसॉर्टचे पाडकाम करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया सुरु करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अॅड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि ३४ आणि ४२०नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार एकाहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात करण्यात आले आहे.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. परंतु, ९० दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा लावून धरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1589796998190100480?s=20&t=PGuQXFwrOaMXNllt6LPZtQ
Shivsena MLA Anil Parab FIR Registered
Dapoli Resort