मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होत असल्याची चिन्हे आहेत. कारण, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळेच ते जवळपास १० ते १३ आमदारांना घेऊन गायब झाले आहेत. शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी अटकळ बांधली जात आहे. यासंदर्भात शिंदे हे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहेत.
भाजपने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा शह दिला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही संख्याबळ नसतानाही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला आहे. महाविकास आघाडीमधील आमदार फुटले आहेत. त्यातच आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे समोर येत आहे. कालपासून शिंदे आणि त्यांच्यासबोत १० ते १३ आमदार गायब झाले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषदेत काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई मनपा निवडणूक
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत फूट पडणार असल्याने ही बाब अतिशय गंभीर समजली जात आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेला या निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपने आक्रमक धोरण स्विकारले आहे. जर, शिंदे भाजपमध्ये गेले तर शिवसेनेला यंदाही मुंबई मनपा निवडणूक अवघड ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
shivsena minister eknath shinde bjp entry chances