मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर येत आहे. ही भूमिका मांडल्यानंतरही ठाकरे यांनी शिंदे यांना पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली नेतेपदावरुन दूर केले आहे. यामुळे आता शिंदेशी जुळवून घ्या म्हणणारे १४ खासदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवडाभरात राज्यातील राजकारणात अनेक वेगवान आणि अभूतपूर्व घडामोडी घडल्या. राजकीय हालचालींमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. शिवसेना अबाधित राहण्यासाठी आता शिंदेशीच जुळवून घ्यावं अशी भूमिका काही खासदारांकडून मांडण्यात येत आहे. तरीही ठाकरेंनी शिंदेंना नेतेपदावरुनच दूर केल्याने हे खासदार आता काय करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याविषयी संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “खासदार फुटण्याच्या मार्गावर आहे हे बोलणं चुकीचे आहे. कारण कालच पक्षातील खासदारांची बैठक पार पडली आहे. मला भाजपाच्या एका शाखेने बोलावले असल्याने मी बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. पण पक्षप्रमुखांशी माझे बोलणे झाले आहे. शिवसेनेमध्ये आमदार आणि खासदार निवडून आणण्याची पूर्ण क्षमता आहे. जरी हे खासदार गेले तरी कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. मतदारदेखील शिवसेनेच्या बाजूने आहे. त्यामुळे काहीही नुकसान होणार नाही.”, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जातंय..
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार अस्तित्वात आले आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणताना कठीण जातंय, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तसेच शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shivsena Member Of Parliament Rebel MLA group MP Sanjay Raut