इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभचा पिक्चर होताना ॲम्ब्युलन्स घेऊन येतो तसं येत असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यातून दिला.
शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, पाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करत शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला. ‘जर तुम्हाला वाटत असेल शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशान महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज तर मी तयारीने उभा आहे. ९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती आली होती हे बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं, पुरे झालं, ती व्यक्ती कोण सांगणार नाही, ते हयात आहेत. मी पिक्चर पाहिला, तो नाना पाटेकर यांचा प्रहार चित्रपट आहे. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभा राहोत. सांगतो कम ऑन किल मी. तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता ना तो ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं येत असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या, येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… जीव काय बोलतोस काय? असा प्रश्न करत निशाणा साधला. या मेळाव्यात त्यांनी मनसेच्या युतीचे संकेतही दिले.