मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते संजय राऊत, अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता यशवंत जाधव यांना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असलेल्या यशवंत जाधव यांच्या तब्बल ४१ मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सत्ताधारी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे जणू काही हात धुवून लागले आहेत. सोमय्या यांनी अनेक नेत्यांच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे उघड केल आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जाधव यांच्याशी संबंधित तब्बल ४१ मालमत्तावर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. त्यात भायखळ्यातील एका इमारतीतील ३१ फ्लॅट्स तसेच वांद्रे मधील सुमारे ५ कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. यानंतर आता जप्तीची कडक कारवाई करण्यात आली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1512291307536130048?s=20&t=z02J_hah1ebx2DN8Y9qNQw
यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी जानेवारी महिन्यात केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्या यांनी जाधवांर केला होता. इतकेच नव्हे तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. यशवंत जाधव हे सध्या मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष असून त्यांनी व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जाधव दाम्पत्याने यांनी शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत रोख पैसा या कंपनींना देण्यात आले आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वःतःच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकूण १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमधून कर्ज म्हणून घेतल्याचेही आयकर विभागाला निदर्शनास आले आहे.
आयकर विभागाच्या अहवालानुसार, उदय शंकर महावर या व्यक्तीने २०१९-२० मध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना सुमारे १५ कोटी दिले. जाधव यांच्या डायरीचीही मुंबईत सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ही डायरी आयकर विभागाला मिळाली आहे. याच डायरीमध्ये ‘मातोश्री’ शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख केबलमॅन असून दुसरी व्यक्ती महिला आहे, मात्र आणखी दोन नावांचाही उल्लेख असल्याची माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना नेत्यांवर आयकर आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाईचा धडाका लावल्याने शिवसैनिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.