मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शिवसेनेसह सुमारे ४७ आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग घेतला आहे. त्यात विद्यमान मंत्र्यांसह माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. माजी मंत्री व शिवसेना आमदार संजय राठोड हे सुद्धा शिंदे गटात आहेत. ज्या कारणामुळे राठोड यांचे मंत्रिपद गेले त्याबाबत आता शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राठोड यांची पोलखोल करणारी सीडी आमच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
संजय राठोड हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना त्यामुळे तरुणी आत्महत्याप्रकरणी त्यांना ‘पवित्र’ करून घेतले जाऊ शकते. आम्ही मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करू. आमच्याजवळसुद्धा ३८ मिनिटांची सीडी आहे, ‘असा गौप्यस्फोट शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्हयातून संजय राठोड हे चार वेळा निवडून आले. २००४ मध्ये पहिल्यांदा दारव्हा विधानसभा मतदारसंघातून, त्यांनतर २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही निवडणुकीत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विजय झाले ते शिवसेना पक्षात होते, आता त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची घोषित संपत्ती सहा कोटी २८ लाख ८७ हजार ४९७ रुपये इतकी आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून २०२१ मध्ये एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात विविध आरोप करण्यात आले पण कुठेही तक्रार वा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात येते. परंतु गुन्हा दाखल झाला होता, तो दबावातून मागे घेण्यात आला, किंवा प्रकरण दाबून टाकण्यात आले असा आरोप करण्यात येतो.
जिल्ह्यातील संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी आमदार राठोड यांच्याविरुद्ध आंदोलन केले. या वेळी गायकवाड बोलत होते. या वेळी यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे म्हणाले, राठोड हे ‘ डुपलीकेट’ नेते आहेत. त्यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणे दडलेली आहेत. त्यांची सर्व प्रकरणे उजेडात आणू आणि निष्ठावंताच्या सहकार्याने आणि परिश्रमाने शिवसेना आणखी बलवान बनवण्याचा प्रयत्न करू, असे ढवळे म्हणाले. विशेष म्हणजे या मोर्चापूर्वी टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या निषेध सभेत जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
shivsena jilha pramukh challenge to ex minister rebel mla sanjay rathod Maharashtra political crisis