मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयावरून गदारोळ माजलेला असतानाच शिवसेना पक्षाला मिळणार फंड आता कुणाकडे जाणार, शिंदे गटाने व्हिप लागू केल्यास तो ठाकरे गट मानणार का, शिवसेना भवन कुणाचे राहणार आदी नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला असला तरी पक्षपातळीवर अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीत आहे. त्यावरुनच आता पुन्हा एकदा दोन्ही गटातील संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचा व्हीप आता ठाकरे गटाला लागू होणार का? ठाकरे गटाचे आमदार तो मानणार का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्येकाला आहे हा अधिकार
निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी न्यायालयीन लढाई अजून सुरूच आहे. त्यामुळे शिंदे गटाचा व्हिप आम्हाला लागू होऊ शकत नाही, आम्ही तो स्वीकारणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी दिली आहे. तसेच या सर्व प्रकरणात ठाकरे गटाच्या उर्वरित १५ आमदारांना शिंदेंच्या पक्षाचा व्हिप लागू होईल, असे दिसत नाही. कारण प्रत्येकाला आपला वेगळा गट करून राहण्याचा अधिकार आहे, अशी माहिती विधिमंडळाचे माजी प्रधान अनंत कळसे यांनी दिली.
देणग्या, फंड याचे नेमके करायचे काय?
अनेक मुद्यांवर अजून कुठेही स्पष्टता नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे हा वाद राहीलच. सोबतच शिवसेना पक्षासाठी आलेल्या देणग्या आणि जमा झालेला फंड याचे नेमके करायच काय? हाही प्रश्न तेवढाच वादग्रस्त ठरणार आहे, असे सांगितले जात आहे.
Shivsena Fund MLA MP Corporator Whip Politics