पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आणि आता मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणे शिवसेनेच्या माजी खासदाराला चांगलेच महागात पडले आहे. याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळेच उद्धव यांनी या माजी खासदाराची सेनेतून हकालपट्टी केली आहे. शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना पक्षाचे जणू काही ग्रह फिरले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सुमारे ४५ पेक्षा जास्त आमदारांसह वेगळा गट स्थापना करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू झाला आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. पुण्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उघडपणे शिवसेना पक्ष विरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यात त्यांनी शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी ठामपणे भूमिका घेण्याऐवजी शिवसेनेचा मित्र पक्ष राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यामुळे ठाकरे यांनी अखेर आढळराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला होता, हिच पोस्ट आढळरवांना भोवली आहे. दरम्यान, याबाबत आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे झाले होते, त्यावरुन लगेच सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल, अशी पुसटशी कल्पनाही नव्हती असे शिवाजीराव आढळराव म्हणाले.
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी २००४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी १५ वर्षे प्रतिनिधीत्त्व केले. संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केली होती.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आढळराव आणि राष्ट्रवादीतील शितयुद्ध अनेकदा पाहायला मिळाले. शिरुर लोकसभेतील वारंवार महाआघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिरांच्या उपस्थितीत नुकताच मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात आढळरावांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधी सूर कायम ठेवला होता.
Shivsena Ex MP Remove from party Wishes to Eknath Shinde