मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाचे मोठे पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. शिंदे यांचे आमदार संख्याबळ दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ तीन पर्याय आहेत. त्यातील कुठलाही एक त्यांना निवडावाच लागणार आहे.
पर्याय क्रमांक १
शिवसेनेचे बहुतांश सदस्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतील, तर सहाजिकच ते तसा दावा करतील. परिणामी, ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीही होऊ शकतील. अशा स्थितीत शिवसेना सत्तेत कायम राहू शकते.
पर्याय क्रमांक २
एकनाथ शिंदे आपला नवा पक्ष स्थापन करून सभागृहात बहुमत सिद्ध करून सत्तेवर येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे भाजपसह कोणत्याही पक्षाचा पाठिंबा देऊ शकतात. मात्र, सभागृहात बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.
पर्याय क्रमांक ३
एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर भाजपची सत्ता येऊ शकते. शिंदे आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले नाहीत तरीही ते भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात.
राज्यपालांकडे अर्ज
या संपूर्ण प्रकारात एकनाथ शिंदे यांना पुढचे पाऊल आता टाकावेच लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अल्पमतात आले तरी ते आपली मूठ उघडणार नाहीत. भाजपला पाठिंबा आणि सरकार स्थापनेबाबत पूर्ण खात्री असती तर त्यांनी आतापर्यंत दावा केला असता. मात्र, मागील अनुभवातून धडा घेत भाजप पुढे येऊन दावा सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत मुख्य भूमिका म्हणजे एकनाथ शिंदे यांची होय. शिंदे हे राज्यपालांनाच अर्ज करतील. मग ते स्वतः सरकार बनवायचे असो किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा असो. यानंतर राज्यपालांची भूमिका समोर येईल. आमदारांच्या संख्येनुसार ते संबंधित पक्षाला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करू शकतात.
shivsena eknath shinde 3 options maharashtra political crisis