मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आक्रमकता स्वीकारली आहे. यासाठीच यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेत शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने २२ आणि २६ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्यासाठी परवानगीचे अर्ज मुंबई महापालिकेकडे केला आहे. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने उच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी आता उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा घ्यायचा असून त्यापूर्वी निर्णय घ्यावा, जेणेकरून तयारीत सहजता येईल, असे शिवसेनेने न्यायालयाकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे. शिवसेना आपल्या ६ दशकांच्या इतिहासापासून मेळावा घेत आहे. पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्यावतीने तात्काळ सुनावणीच्या मागणीसह उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात यावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर वकील जोएल कार्लोस यांच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, शिवसेना १९६६ पासून शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करत आहे. रॅलीचे कोणतेही निमंत्रण न देता कार्यकर्ते या मैदानात पोहोचतात. अशा स्थितीत येथे मेळाव्यावर बंदी घालणे चुकीचे असून त्याला लवकर मान्यता देण्यात यावी. राज्य सरकारने जानेवारी २०१६ मध्ये अधिसूचना जारी करून शिवाजी पार्कला बिगर क्रीडा उपक्रमांसाठी बुक करण्याची परवानगी दिली होती, असेही शिवसेनेने याचिकेत म्हटले आहे.
देसाई यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, शिवसेनेने २२ ऑगस्ट आणि पुन्हा २६ ऑगस्टला मुंबई महापालिकेत मेळाव्यासाठी अर्ज केला होता, मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ते म्हणाले की, अर्ज देऊन २० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असून आम्हाला कार्यक्रमाची तयारी करायची आहे. यावर निर्णय घेण्याचे आदेश बीएमसी आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर मेळाव्याला मान्यता न देण्याचे कोणतेही कारण पालिकेकडे नसल्याचे शिवसेनेने अर्जात म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा. शिवसेनेची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
Shivsena Dasara Melava Mumbai High Court Petition
Uddhav Thackeray BMC Decision Politics
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD