मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. जनतेला भावनिक साद घालण्यासाठी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझरदेखील शिवसेनेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘निष्ठेचा सागर उसळणार’, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी पहिला टिझर लाँच करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सेनेच्या हा टिझर शेअर करण्यात आला असून यामध्ये पूर्वीच्या काळात दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर झालेली गर्दी, उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो…, अशा पद्धतीने होणारी त्यांच्या भाषणाची सुरुवात यात दाखवण्यात आली आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…, असं कॅप्शनदेखील या व्हीडिओला देण्यात आलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील ‘माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो’ हे वाक्यदेखील टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच शिंदे गटाप्रमाणे शिवसेनेनेही एक नेता, एक झेंडा, एक मैदान… ही टॅगलाईन वापरली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन टिझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करण्यात आले आहे.
यंदा दोन दसरा मेळावे..
शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे यंदा होणार आहेत. दोन्ही गटांनी आपापला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे गटाकडूनही त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लाँच करण्यात आला आहे. टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे. ‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे.
पहिले कुणाचे भाषण ऐकणार? – अजित पवार
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची वेळ जवळपास सारखीच असल्याने नक्की कोणाचे भाषण ऐकायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तुम्ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन, असे अजित पवार यांनी सांगितले.
https://twitter.com/ShivSena/status/1575716947215327232?s=20&t=0FM31Z0WDLXAR3n9mi2yfA
Shivsena Dasara Melava Teaser Launch