मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन चढाओढ सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा असणार, या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. शिवसेनेने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, ‘चलो शिवतीर्थ’ म्हणत दसरा मेळाव्याचे बॅनर अनेक ठिकाणी लावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो असल्याने शिवसेनेने आपला हुकमी एक्का बाहेर काढल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरवर्षी दसऱ्यानिमित्त दादरमधल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदा येथे शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की उद्धव ठाकरेंचा होणार याविषयी वाद सुरु आहे. अद्याप मेळावा कोण घेणार याविषयी काही ठरलेले नसले तरीही आता शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
आक्रमक पवित्रा
शिवसेनेच्या या बॅनर्सवरुन एकीकडे दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलचं तापले असले तरी शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळाव्यासाठी अद्याप पालिकेकडून कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी यंदा कोणालाही मिळणार नाही, अशा चर्चादेखील रंगल्या आहेत. शिवसेनेने मात्र या सर्व घडामोडींवर आक्रमक पवित्रा घेत थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. ‘गद्दारांना क्षमा नाही…!’, अशा आशयाचे बॅनरदेखील शिवसेनेकडून झळकवण्यात आले आहेत.
..तर कोर्टात जाणार!
शिवतीर्थावर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.
Shivsena Dasara Melava Special This Year Politics Uddhav Thackeray
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD