मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचा झेंडा हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच काही आमदारांसह ते सध्या सूरतमध्ये आहेत. शिंदे हे शिवसेना सोडणार का, भाजपमध्ये दाखल होणार की शिवसेनेतच ३७ आमदारांचे संख्याबळ मिळवून सुरूंग लावणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसे झाले तर शिवसेनेतील ही आजवरची सर्वात मोठी दुफळी असेल. कारण, आजवर छगन भुजबळ, राज ठाकरे आणि नारायण राणे हे दिग्गज नेते जेव्हा सेनेतून बाहेर पडले त्यावेळीही एवढे पक्षाचे नुकसान झाले नाही जे आता होण्याची चिन्हे आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असूनही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची पावले उचलली आहेत. त्यांना जवळपास २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथे शिवसेनेचे केवळ १८ ते २० आमदारच हजर झाले आहेत. त्यामुळे शिंदेंसोबत अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिंदे हे महाविकास आघाडी सरकार पाडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी करावी यासाठी शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जाते. या मोहिमेत शिंदे यशस्वी झाले तर शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण ठरेल.
भुजबळांनी जय महाराष्ट्र केले तेव्हा
१९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी ८ आमदारांसह सेनेला जय महाराष्ट्र केले होते. भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी १९६० च्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकारणात येण्यापूर्वी भुजबळ भायखळा मार्केटमध्ये भाजी विक्रेते होते. जिथे त्यांच्या आईचे लहान फळांचे दुकान होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने त्यांनी शिवसेनेचा झेंडा रोवला. १९९१ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
राणेंसोबत होते १० आमदार
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. स्थानिक शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. शिवसेनेने त्यांना थेट मुख्यमंत्री पदही दिले. भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये त्यांना महसूल खाते मिळाले. राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीचा ऑक्टोबर १९९९ च्या महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पराभव झाला. निवडणूक प्रचारात राणे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद उघड झाले. ठाकरे आणि राणे यांच्यातील संबंध २००५ मध्ये पूर्णपणे तुटले. राणेंनी १० आमदारांसह शिवसेना सोडली होती.
राज यांची सोडचिठ्ठी
राज ठाकरे हे पहिले शिवसैनिकही होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी संबंध तोडून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर एकही आमदार त्यांच्यासोबत गेला नाही. मात्र त्यांच्या पाठोपाठ मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडली.
shivsena damage eknath shinde history past biggest set back uddhav thakre narayan rane raj thakre chhagan bhujbal