मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. एका गटाचे नेतृत्व पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, तर दुसरीकडे बंडखोर नेते व विद्यमान एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्या राजकीय पेचप्रसंगात शिवसेना पक्षात फूट पडली आहे. शिवसेनेचे विभाजन आता निश्चित झाल्याचे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे अधिकाधिक आमदारांचा पाठिंबा दर्शवत ‘धनुष्य-बाण’ या निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगत आहेत. हे दिसते तितके सोपे नसले तरी! यासाठी एक संपूर्ण प्रक्रिया आहे, नियम आहेत. ज्यात राजकीय पक्षाच्या चिन्हावर निर्णय घेतला जातो.
न्यायालयाचा निर्णय याबाबतीत काही होऊ शकतो परंतु दरम्यान ‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कारण शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडल्यामुळे पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे.
कायदेशीर लढाईत कदाचित अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले आहे. 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहून शिवसेनेचं नुकसान होत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाने केला आहे. त्यासाठी बंडखोरी नव्हे, तर उठाव केल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जातो. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहेत. खासदारांचाही पाठिंबा वाढत असल्याचं सांगिण्यात येते. तर दुसरीकडे वेगवेगळ्या नगर पालिकांमधील नगरसेवकही आता हळूहळू शिंदे गटात सामील होत आहेत.
आता वाद कोर्टात गेला आहे. शिवसेना नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा आहे. ठाणे, पुणे त्यानंतर नवी मुंबई अशा पालिकांमधील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबाजूने उभे राहत आहेत. मात्र नगरसेवक यांच्यासोबत सरपंच, शिवसेनेचे पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते अशांचीही फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदेची खरी ताकद वाढणार आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह जर त्यांना मिळवायचे असेल, तर त्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षातच उभी फूट पडलेली आणि दोन तृतीआंश बहुमत शिवसेनेतील आपल्या बाजूने आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे.
दि. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहेत. आता सुनावणीमध्ये नेमके काय घडते, याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचं काय होणार? या प्रश्नावर 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात वादळी युक्तिवाद होण्याची शक्यता वर्तवली. एखाद्या राजकीय पक्षात फूट पडणे ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी देशात अनेक पक्षात फूट पडल्यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार हा वाद झाला होता. मात्र त्याचे काही नियम आणि कायदे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार नेले. आता पक्षाचे चिन्ह सुद्धा काबीज करता येईल का? याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, “ राज्यघटनेचं पक्षांतर कायद्याचं 10 वं शेडूल्ड प्रमाणे जर दोन तृतीअंश लोकं पक्षातून बाहेर पडली तर तो पक्ष समजाला जातो आणि उरलेला एक तृतीयांश गट धरला जातो. तेव्हा जर का बाहेर पडलेला गट हे सिद्ध करू शकला तर निवडणूक आयोग त्याचा विचार करू शकतं”. असं उल्हास बापट यांनी म्हटले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सांगितलं की, आधी एकनाथ शिंदेंचा गट स्थापन झाला पाहिजे, त्यानंतर त्यांचा दोन तृतीयांश बहुमताचा गट स्थापन केला पाहिजे मग त्या गटाची अधिकृत नोंद झाली पाहिजे आणि मग त्यानंतरच ते शिवसेनेवर आपला पक्ष म्हणून दावा करु शकतात आणि धनुष्यबाणावर दावा करू शकतात असं असिम सरोदे म्हणाले आहेत. कायद्यामध्ये सर्वांच म्हणणं ऐकून घेण्याचं तत्व पार पाडले जाते. त्यामुळे निवडणूक आयोग दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेऊन मगच त्यावर निर्णय देईल ,असेही असिम सरोदे यांनी सांगितले.
Shivsena Crisis Uddhav Thackeray Vs Rebel Shinde Group Party Symbol Politics