मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकतीच महाराष्ट्रातील सत्ता गमावलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी आणखी एक मोठा धक्का बसला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र १२ खासदारच पोहोचले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही ७ खासदार बैठकीला पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १९ खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बंडखोरी सुरू असल्याने लवकरच शिवसेनेचे काही खासदारही पक्षांतर करू शकतात, असे मानले जात आहे.
याआधीही काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना एकनाथ गटाशी समेट करण्याची शिफारस केली होती. उद्धव यांनी बोलावलेल्या बैठकीला गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्य माने, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित, राजन विचारे आणि राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदार पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीला शिवसेनेचे तीन राज्यसभा खासदारही उपस्थित होते. एकूण २२ जणांना आमंत्रित करण्यात आले होते.
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला न गेलेल्या खासदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे गटाने नुकतेच गवळी यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी राजन विचारे यांना जबाबदारी दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही बैठक राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आली होती. बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या बहुतेक सदस्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे सुचवले. अशी माहिती शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी दिली.
मात्र, शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दावा केला की, लोकसभेतील पक्षाच्या १८ पैकी १५ सदस्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या उपनगरातील निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. यासंदर्भात त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांव्यतिरिक्त, कलाबेन देऊळकर या दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून शिवसेनेच्या खासदार आहेत.
कीर्तिकर म्हणाले की १३ खासदार या बैठकीला उपस्थित होते, तर इतर तीन – संजय जाधव, संजय मंडलिक आणि हेमंत पाटील – बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी नेतृत्वाला पाठिंबा दिल्याची पुष्टी केली. कीर्तीकर म्हणाले, “पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असे बहुतांश खासदारांचे मत होते.” राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे.
Shivsena Crisis 7 MP absent Meeting Uddhav Thackeray