मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करीत वेगळा गट निर्माण करणाऱ्या शिंदे गटाला आता विधीमंडळात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या १६ आमदारांचे काय होणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर, शिंदे गटाने व्हिप जारी केला तर ठाकरेंसह १६ आमदार शिंदेंना मतदान करणार का की अनुपस्थितत राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधासभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. सहाजिकच या निर्णयामुळे शिवसेनेचे अजय चौधरी यांची मान्यता रद्द झाली आहे. तर दुसरीकडे भरत गोगावले हेच शिंदे गटाचे प्रतोद असणार आहेत. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. कारण, शिंदे आणि गोगावले यांचे आदेश (व्हीप पाळणे) हे आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेनेच्या १६ आमदारांना बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, अशी नियमात तरतूद असल्याचे बोलले जाते.
अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील या सर्व १६ आमदारांची आमदाराकी धोक्यात येऊ शकते. आदित्य ठाकरे यांचे वय ३२ वर्षे असून शिवसेनेच्या युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मुंबई विद्यापीठावर अनेक वेळा मोर्चे काढून त्यांनी निवेदने दिली, आंदोलने केली. त्यानंतर ते शिवसेनेच्या राजकारणात चमकू लागले. ते युवासेना प्रमुख आहेत. तसेच राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते. ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि शिवसेनाप्रमुख संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.
एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. शिवसेनेतून घाण निघून गेली असे आदित्य ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात म्हणाले होते साहजिकच शिवसेनेचे बंडखोर मंत्री आणि आमदार यांचा आदित्य ठाकरेंवर राग आहे तो आता विधिमंडळात व्यक्त होईल असे दिसून येते. कारण आता शिवसेनेच्या गटनेतेपदी आता एकनाथ शिंदे हेच कायम राहणार आहेत. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. हा देखील शिवसेनेला मोठा हादरा बसलेला दिसून येतो.
विधानभवन सचिवालयाने दिलेल्या पत्रामुळे आता अजय चौधरी आणि सुनील प्रभू या दोघांचीही नियुक्ती अवैध ठरविण्यात आली आहे. मात्र त्याच वेळी दुसरीकडे शिवसेनेचे नेते अजय चौधरी यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढा देऊ. ‘तर ‘हा लोकशाहीचा खून अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू व्यक्त केली. आता बहुमत चाचणी होणार आहे. त्यावेळी पक्षानं जारी केलेला व्हीप पाळणे हे आमदारांचे कर्तव्य ठरते. त्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही, तर आमदारकीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार सुनील प्रभू, नितीन देशमुख, राहुल पाटील, संतोष बांगर, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वाईकर, भाष्कर जाधव, संजय पोतनीस, अजय चौधरी, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी व कैलास पाटील यांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Controversy Shinde Group Whip Aditya Thackeray And 16 MLA