औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही भावांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे. कारण, राज ठाकरे यांनी औरंगाबादेत ज्या मैदानात जाहीर सभा घेतली होती तेथेच आता उद्धव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे त्याच ठिकाणी राज यांना कडक उत्तर देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील मराठवाडा संस्कृती मंडळाच्या मैदानावर भव्य सभा झाली. त्यानंतर आता ५ आठवड्यांनी उद्धव ठाकरे यांची येत्या 8 जून रोजी याच मैदानावर भव्य सभा होणार आहे. शिवसेनेसाठीही हे ठिकाण खास आहे, कारण 34 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्व कार्ड घेऊन सभा घेतली होती. त्यामुळेच पक्षाने मराठवाड्यात आपला पाया पसरवला होता.
औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा 37 व्या वर्धापन दिन मेळावा 8 जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे औरंगाबादला येणार आहेत. पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, हा मेळावा भव्य असेल आणि त्यामुळे मैदान छोटे होईल, अशी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. आमच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धवजी संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सभेला संबोधित करतील,”.
राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. याच सभेत त्यांनी राज्य सरकारला भोंग्यांचा अल्टीमेटम दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पुनरुच्चार करण्यासाठी मनसेने औरंगाबादमध्ये कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राज यांच्या सभेला मोठी गर्दीही जमली होती.
मराठवाड्यातील जनतेसाठी उद्धव यांची सभा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यासाठीच सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार बैठका सध्या सुरू आहेत. शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विकासावर उद्धव हे बोलणार असल्यायाचे सांगितले जाते. या मेळाव्याला मराठवाड्याच्या सर्व भागातून शिवसैनिक हजेरी लावण्याची अपेक्षा आहे.
शिवसेनेची ताकद मराठवाड्यात असून, शिवसेनेने या भागात आपली पकड कायम ठेवली आहे. येथे 46 विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या महिन्यात, उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना नांदेड आणि जालन्यासह मराठवाड्यातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले होते. जिथे शिवसेना आपला पाया वाढवू शकते.