ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या तोंडची सत्ता पळवल्यानंतर आज प्रथमच उद्धव दिघेंच्या दर्शनासाठी ठाण्यात दाखल झाले. यावेळी ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमालाही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे ठाण्यात येणार हीच आज महाराष्ट्रात मोठी बातमी होती. पण उद्धव यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाणार अशीही शक्यता होती आणि तसे झाले तर तीच मोठी बातमी ठरणार होती. नेमके तसेच झाले. आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी उद्धव पोहोचले आणि त्यांनी त्यांना अभिवादन केले. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी उद्धव यांनी पुष्पहार अर्पण केले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे याठिकाणी आले होते. यावेळी जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमीत्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी उद्धव आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर आणि बंडखोरांवर हल्ला चढवणार, याचा अंदाज होता आणि उत्सुकताही होती.
‘दिघेंच्या नावाचा वापर करणार’
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव आणि त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे. आता आम्हीही आनंद दिघे यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करण्याचे ठरविले आहे. दिघे यांचा वारसा आम्हाला पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ द्यायचा नाही, या शब्दांत उद्धव यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘जे गेले त्यांना जाऊ द्या. धगधगते शिवसैनिक माझ्यासोबत आहेत आणि तेच निखारे उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे होते, ते विकले गेले. ही केवळ शिवसेनेची नाही, महाराष्ट्राची बदनामी आहे, असेही उद्धव म्हणाले.
उद्धव प्रथमच ठाण्यात
सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे एकदाही ठाण्यात आले नव्हते. आज प्रथमच उद्धव ठाण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या टेंभी नाक्यावरील भेटीला विशेष महत्त्व होते. आदित्य ठाकरे मात्र दरम्यानच्या काळात दोन ते तीन वेळा ठाण्यात येऊन गेले आहेत.
https://twitter.com/ShivSena/status/1618514777319567360?s=20&t=LrAWTpn0X_gQzFo_meoOhg
Shivsena Chief Uddhav Thackeray Thane First Tour Politics