बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्याची शिवतिर्थावर मूळ शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे, त्यापैकीच आज दि.२६ नोव्हेंबर रोजी एक सभा बुलढाणा येथे झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार तसेच भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर वीज बिल माफ करण्यासंदर्भात टीका केली होती, त्याची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली तसेच या संदर्भात खुल्या आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते. तेव्हा केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही? असे विचारले होते. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझे उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार आपल्या महाराष्ट्राच्या गादीवर बसले तेव्हापासून राज्यात घसरण सुरू झाली आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केले नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर कडक शब्दात वार केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात, ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? अरे पण आमचा शेतकरी राबतो असून तो आज विचारतो मी खायचे काय? शिव्या खावून तुमचे पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. त्याचप्रमाणे पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मी सर्वांच्या साक्षीने खुले आव्हान देतो असे म्हणत व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले.’ अहो देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझे आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. तेव्हा सरकारने बँकेला गॅरंटी देऊन माफ करायला लावली होती.
मात्र तोपर्यंत या रेड्यांनी शेण खाल्ले. आणि तेव्हा गेले गुवाहाटीला, आता देखील ते नवस फेडायला गेले आहेत. परंतु मी त्यांना रेडे म्हटले नाही त्यांच्याच एका मंत्र्याने हा शब्द वापरला आहे कुणाचे नुकसान झाले? अतिवृष्टीचे पैसे कुणाला मिळाले त्यांनी हात दाखवावे. राज्य खोटे बोलून चालले आहे. काही वाटेल ते चालले आहे. ही जनता भोळीभाबडी राहिली नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते व पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या या भाषणातील टीकेवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray Open Challenge to Fadanvis
Buldhana Sabha Politics Farmers