मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्रांची मनमोकळेपणाने आणि दिलखुलास उत्तरे दिली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत पूर्वी आपले असलेले आणि आता विरोधकांना जाऊन मिळालेले एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांना चांगलेच शाब्दिक फटकारे ही दिले, तसेच यावेळी काही प्रश्नांवर ते भावनिक झालेले देखील दिसून आले. विशेषतः कोरोना काळात त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया आणि आजारपण या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होते आहे. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते?
त्याचप्रमाणे गेल्या काही दशकातली शिवसेनेची वाटचाल पाहिल्यास शिवसेनेच्या पावलोपावली फुटीचे राजकारण आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्वात आधी छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे सहाजिकच वारंवार हे फुटीचे आणि विश्वासघाताचे राजकारण शिवसेनेसोबतच का? असा प्रश्न विचारला असता उद्धव यांनी त्यास चोख उत्तर दिले आहे.
ठाकरे म्हणाले की, “आम्ही पक्ष व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे, माँ यांनी आम्हाला पक्षातील नेत्यांना कुटुंब म्हणून पाहायला शिकवलं. एकदा आपलं म्हटलं की आपलं. त्यामुळे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही अंधविश्वास टाकतो, ताकद देतो आणि राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते.” या बाबत उत्तर देताना ठाकरे पुढे म्हणतात की, शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली चालवत नाही, तुम्हीही गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात. आम्ही शिवसेना एक परिवार म्हणून बघत आलो आहे असे उद्धव ठाकरे यांनी फुटीची कारणं सांगितली आहे.
आपल्यावर हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो? त्याचे काय ?यावर ठाकरे म्हणाले, “आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचे आहे की, सन २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होते? आजही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. तेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले होते. तेव्हा अनेकांना वाटलं शिवसेना आता संपेल. मात्र, शिवेसना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आले,” असेही ठाकरेंनी नमूद केले. आमच्या जीवावर त्यांचे लोक निवडून आले परंतु ते आम्हालाच संपवायला निघाले होते. त्यांची अशी योजना होती की, बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवायचा त्यांचा डाव होता पण तुम्ही शिवसेना उभी केली,” असं म्हणत राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता उद्धव यांनी भाजपावर टीका केली. भाजपाला स्वत:चे आदर्श निर्माण करता आले नाहीत, असा टोला उद्धव यांनी लगावला.
शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो लावून, त्यांना सभांमध्ये घेऊन जाऊन, भाषण ठोकून निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान उद्धव यांनी बंडखोर गटातील शिवसेना नेत्यांना केले आहे. तसेच
पुढे उद्धव यांनी बंडखोरांना बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याशिवाय पर्याय यांनी असंही म्हटलंय.
“बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचे. माझं आव्हान आहे की, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका,” असे उद्धव यांनी बंडखोरांना म्हटले आहे. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला, पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं, असंही उद्धव बंडखोरांबद्दल बोलताना म्हणाले.
सध्याच्या या सगळ्या कालखंडात कधी नव्हे तो अघोरी प्रकार होतोय. जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय,” असं म्हणत उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “कारण त्यांना पर्याय नाहीय,” असं उत्तर दिलं. उद्धव यांनी कायद्याच्या आधारे मत व्यक्त करताना, “मी जे काय थोडंफार न्याय कायदेतज्ज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यातून सांगतो की आधी दोन तृतीयांश सदस्य संख्या झाल्यावर वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले ते भलेही दोन तृतीयांश असतील तरी त्यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही हे कायदेतज्ज्ञ सांगतायत. मी कायदा लिहिलेला नाही. वाचलेला नाही. मी घटनातज्ज्ञांनी सांगितलेली मतं ऐकून, त्यांच्याशी बोलून सांगतोय,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण कोरोना काळात आजारी होतात, लोकांना भेटत नव्हता? बाहेर फिरत नव्हता? याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती. तसेच मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं.” तसेच
“पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Shivsena Chief Uddhav Thackeray on Rebel History Politics