मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंदुत्व आम्ही सोडले आहे असे म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे, असे सांगत उद्धव यांनी शिवसेनेत येणाऱ्यांना दारे खुली असल्याचे सांगितले.
ठाकरे म्हणाले की, “वेगवेगळ्या विचारांची बहुजन, वंचित काही ठिकाणी मुस्लीम बांधव सुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. एक वेगळं वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण होत आहे, जे देशासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अनेक विषय आहेत, त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. खरं हिंदुत्व शिवसेनेकडे आहे, असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला नाही तर महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्त्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन मी करतो,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, “शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी. शिवसेनेला 56 वर्षे झाली आहेत, असे 56 लोक बघितलेली आहेत. शिवसेना ही निष्ठावंताच्या रक्तावर मोठी होणारी आहे, गद्दारांच्या नाही.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दोन अर्ज करुनही मुंबई महापालिकेकडून अद्याप परवानगी न मिळालेली नाही. याविषयी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “दसरा मेळाव्याबाबत संभ्रम नाही. दसरा मेळावा आमचाच होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केलेली आहे.”
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव कदम म्हणाले की,”शिवसेनेचं हिंदुत्त्व हे खरं हिंदुत्त्व आहे, भ्रमित करणारं नाही. कारण मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं आहे. म्हणून या मातोश्रीचं महात्म्य आणि महत्त्व टिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगत आहेत, तिथे अस्वस्थ वाटत असेल तर मातोश्रीचं दार उघडं आहे.” तसंच मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल, असंही ते म्हणाले.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1564175423746953216?s=20&t=h-vOElcsTccVLFm9OXaKnw
Shivsena Chief Uddhav Thackeray on Dasara Melava
Politics