मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच सेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे हेच आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, उद्धव ठाकरे यांचा पुढील प्रवास कसा असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे जनतेमध्ये जातील आणि मतदारांना मत द्यायची संधी मिळेल, त्यावेळी चित्र बदललेले असेल. उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत आता कमी आमदार उरले आहेत. तर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता त्यांनी ठाकरेंना जनतेत अधिक मिसळण्याचेच अप्रत्यक्ष सांगितले आहे. तर बंडखोरीसारखे प्रकार नागरिक खपवून घेत नाहीत. त्यांना ते आवडत नाही, हे उदाहरणासह स्पष्टही केले. बंड होत असतात. मात्र शिवसेना संपणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसैनिकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा कदाचित बंडखोरी हा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना संपुष्टात आलेली नाही. येणार नाही. बंड होत असतात. या पूर्वी भुजबळांनी बंड केले होते. आमच्या पक्षात आले. काही झाले नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केले. तेही पराभूत झाले. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असेही पवार म्हणाले.
बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले, या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. कारण पुन्हा त्यांच्या कार्यपद्धतीत आदेश हा एकदा दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा पक्षाचे किंवा वरिष्ठांचा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की, ती स्वीकारायची असते याचे उदाहारण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिले आहे, असे देखील शरद पवार म्हणाले.