मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात बदललेल्या घडामोडींना शिवसेना हा पक्ष सर्वाधिक चर्चेत आला. पक्षातील आमदार फुटल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची नाचक्की झाली. पण निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या १५ आमदारांचे आभार मानणारे भावनिक पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या आमदारांना पाठवले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेना मोठ्या प्रमाणात फुटली. शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना वेळोवेळी आवाहनदेखील केले होते. परंतु, ४० पैकी एकही आमदार परतला नाही. आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी त्यांच्यासोबत राहिलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांनी भावनिक पत्र लिहीले आहे. या पत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या काळात साथ दिल्याबद्दल आमदारांचे आभार मानले आहेत.
पत्रातला मजकूर असा..
“शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली. आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं आहे. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना असं पत्रात म्हटलं आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray Emotional Letter to those MLA’s Maharashtra Political Crisis