मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सत्ता आणि पक्षातील संकट यांच्यातील भावनिक कार्ड उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा खेळले आहे. जिल्हा प्रमुखांसह पक्ष पदाधिकाऱ्यांशी उद्धव यांनी आज संवाद साधला. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडले असले तरी मी लढाई सोडलेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू झालेल्या समस्यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, कोविड गेली दोन वर्षे सुरू आहे. जेव्हा कोविड संपले तेव्हा माझ्या मानेचे दुखणे सुरू झाले आणि आता ही समस्या आहे. कोण कोणत्या वेळी कसे वागेल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, मी आजारी आहे आणि मी बरा होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रार्थना केली.
एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना महत्त्व दिल्याचंही बोलून दाखवलं. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय नाही केलं? माझ्या वाट्यातील दोन मंत्रालये दिली. त्यातील एक नगरविकास खातं. तसेच एकनाथच्या मुलाला खासदारकी दिली. आणखी काय करायला हवं होतं. वाईट आरोप असतानाही मी संजय राठोड यांची काळजी घेतली आणि ही लोकं आज असं वागताय. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाला शिवसेनेचे मूळ म्हणताना शिवसेना आणि ठाकरे घराण्याशिवाय त्यांना काही करता येणार नाही, असे सांगितले. झाडांवर फुले आहेत, फांद्या आहेत. पण ते मूळ होत नाहीत. कुणी सोडलं तर मला वाईट का वाटावं. वाळलेली पाने जाऊ द्या, नवीन येतील.’
उद्धव पुढे म्हणाले की, ही परिस्थिती निर्माण होईल, याचा आपण विचारही केला नाही. आम्हाला पदावर स्वारस्य नाही. मी आजारी होतो आणि त्यानंतर मानेमध्ये दुखत होते, त्यावर ऑपरेशन करण्यात आले. पण काही लोकांनी त्याच्या मागे दुसरे ऑपरेशन सुरू केले. एवढेच नाही तर आजारपणाचे कारण देत उद्धव ठाकरे भावूक झाले. माझे बरे होऊ नये, असे काही लोक करत होते, मात्र अशा लोकांची मला पर्वा नाही. मला सत्तेची ओढ नाही, पण ज्या पद्धतीने बंड पुकारले गेले ते योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जे गुवाहाटीला गेले आहेत ते केवळ पैशासाठी गेले आहेत. जे गेले आहेत त्यांना काही काळासाठी काहीतरी मिळेल पण फार काळ नाही. आमच्या कुटुंबातील सदस्यांची फसवणूक झाली आहे. काही लोकांनी यापूर्वीही फसवणूक केली आहे, परंतु ते यशस्वी झाले नाहीत, असेही आदित्य म्हणाले.
shivsena chief uddhav thackeray dialogue with party leaders maharashtra political crisis