मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आणि दिवसागणिक धक्के पक्ष प्रमुख उद्धव टाकरे यांना बसत आहेत. पक्षाची स्थिती मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने उद्धव यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. दुसरीकडे उद्धव यांनी आता विविध निष्ठावान नेत्यांना जबाबदारी देण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद संभाजीनगरचे आमदार अंबादास दानवे यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी विधान परिषद हे वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद आहेत. बाकी सर्व घटक राज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
महाराष्ट्रातल्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदी कुणाची वर्णी लागतेय, याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. तर इकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाणार याचेही आडाखे बांधले जात आहेत. भाजपनंतर शिवसेनेचंच संख्याबळ जास्त असल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडेच असेल, असा दावा उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आला आहे. तसे निवेदनही देण्यात आले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार आहेत त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी उपसभापती नीलम गोरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली असून यासंदर्भातील निवेदनाचे पत्र त्यांनी सादर केले आहे.
आता फक्त या पदावर शिवसेनेच्या कोणत्या आमदाराची वर्णी लागतेय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबईतील सचिन अहिर, अनिल परब या दोघांची नावे आधी चर्चेत होती. मात्र मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत संख्याबळ कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत विधान परिषदेत सर्वाधिक 13 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला आहे.
संभाजी नगर (औरंगाबाद ) हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र याच ठिकाणाहून तब्बल पाच आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल झाले. सुरुवातीला सहावे आमदार उदयसिंह राजपूत हेदेखील शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. मात्र त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटातच रोखून ठेवण्याची मोठी जबाबदारी अंबादास दानवेंनी पार पाडल्याचे सांगितले जात असून उदयसिंह राजपूत हेदेखील शिंदे गटात गेले असते तर औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार उरला नसता. त्यामुळे शिवसेनेचा ढासळता बुरूज राखल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद औरंगाबादचे विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांना देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
अंबादास दानवे हे संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख असून राज्य पातळीवरील शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. औरंगाबादेत शहराचे नामांतर असो वा विमातनळाचे नामांतर किंवा शिवसेनेच्या अजेंड्यावरील इतर मुद्द्यांवर अंबादास दानवे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे. अनेकदा त्यांनी विरोधकांवर कडाडून टीकाही केली आहे. त्यातच आता शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील खिंड लढवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडल्याची चर्चा आहे.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा जोमाने कामाला लागावे लागणार आहे. शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटन वाढवण्यासाठी मोठी मोहीमही हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादचा विचार करता शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांना लाभाची पदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे दोन मंत्रीदेखील मराठवाड्यात आहेत. त्यामुळे येथील आमदाराला विरोधी पक्षनेते पद दिल्यास मराठवाड्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहिल, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray big Decision likely for Marathwada