मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. पक्षाचे राज्यसभा खासदार आणि ‘सामना’ या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे काम हाती घेतले आहे. पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून ते सध्या कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली आहे. यासोबतच मोठ्या बंडखोरीनंतर त्यांची पक्षावरील पकडही सैल झाली आहे. दरम्यान, पत्रा चाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याने ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ हातात घेतले आहे. वृत्तपत्राच्या संपादकपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे नाव आले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र उद्धव यांनी स्वत:ची पुनर्नियुक्ती केली आहे.
शुक्रवारी ‘सामना’ वृत्तपत्रात संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव लिहिले होते. ‘सामना’चे संपादन आजवर ठाकरे कुटुंबाकडेच आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत हे कार्यकारी संपादक होते. राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ १९८९ मध्ये सुरू झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले. २०१२ मध्ये त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी संपादकपद सोडले होते आणि त्यांच्या जागी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
Shivsena Chef Uddhav Thackeray Big Decision After MP Sanjay Raut Jail
Saamana News Paper Editor Shivsena Mouth Piece