मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे वर्षभरापूर्वी राज्यात मोठे राजकीय बंड होऊन सत्तांतर नाट्य घडून आले आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन दोघांनीच काही दिवस राज्याचा गाडा चालविला, त्यानंतर एक दोन महिन्यांनी मंत्रिमंडळात १८ जणांना संधी देण्यात आली. परंतु एकंदरीत राज्याच्या कारभाराचा आणि प्रशासन व्यवस्थेचा भार बघता आणखी मंत्र्यांची आवश्यकता होती. परंतु केवळ मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी वर्षभर चर्चा होतच राहिली. आता मात्र मंत्रिमंडळ विस्तार नक्कीच होणार असे म्हटले जात आहे. आणि याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
महिला आमदारांना संधी
मागील वर्षी राज्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नव्हते. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांनाही स्थाना मिळणार असल्याचे सांगण्यात येते.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलेले नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र विस्तारात महिलांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. या शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात काही नवोदितांना संधी मिळणार तर प्रभाव पाडू न शकणाऱ्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला केले जाणार असल्याचेही समजते.
१९ जून पुर्वीच
शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जुन रोजी साजरा होत आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. सोबतच शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो १९ जून आधी होऊ शकतो. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा मुंबईत परतले. आणखी महत्वाचे म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. म्हणजेच भाजपच्या मिशन ४५ ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाचे दोन खासदार
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा देखील केंद्रीय नेतृत्वाचा विचार असून, या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाच्या दोन खासदारांची वर्णी लागू शकते. यावरही अमित शहा यांची या दोन्ही नेत्यासोबत चर्चा झाली. काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चाच सुरु असल्याने आमदार बच्चू कडू यांनी आपल्या तीव्र भावना बोलून दाखवल्या होत्या. सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या अनेक तारखा झाल्या आहेत. इतकेच नाही तर न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले, त्याचीही चर्चा सध्या सुरू आहे .
Shivsena Anniversary Politics Shinde Group