पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘पुणे तेथे काय उणे’ असे अभिमानाने मिरविणाऱ्या या स्मार्ट सिटीचा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे’, असा हल्लाबोल आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामधून भाजपच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून सामनाच्या अग्रलेखातून अनेकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका सामनातून करण्यात आली आहे. पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून ही टीका करण्यात आली आहे. पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवड्यातील धुवाँधार पावसाने दयनीय करून टाकली.
गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे १२५ मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरश: वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेत आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
‘पुण्यात राहतोय की पाण्यात’
आयटीची राजधानी, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या १२५ मिलीमीटर पावसाने वाताहत केली, ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ अशा प्रकारचे विनोददेखील त्यामुळे सोशल मीडियावर शेअर केले जात होते. दरम्यान, यापूर्वी देखील अनेकदा सामनामधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. आता या टीकेला भाजपाकडून काय प्रत्युत्तर मिळते ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shivsena Allegation on Pune Water Problem BJP