मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खा.संजय राऊत यांनी थेट कोणी मते दिली नाही याची नावेच सांगितली आहे. त्यात त्यांनी बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मते दिली नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही, व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली. त्यामुळे हा सुद्धा आमचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी शब्द दिला त्यांनी तो पाळला नाहीत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला. घोडेबाजारातील घोड्यांमुळे सरकारवर फरक पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचे मत बाद केले. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. पण, कांदे यांचेच मत अवैध ठरवले गेले. रवी राणा यांचे मत देखील अवैध व्हायला हवे होते असेही त्यांनी सांगितले.