इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहे. काल ते मुंबईत तातडीने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. या भेटीनंतर तानाजी सावंत यांनी या भेटीमागचे कारण सांगितले.
ते म्हणाले की, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई येथे तातडीने भेटीचा निरोप आला. या निरोपानिमित्त तात्काळ मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली. साहेबांसोबत तब्बल २ तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तातडीने सावंत यांना बोलावल्याचे बोलले जात आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज होते. त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या अधिवेशानही त्यांनी भाग घेतला नाही. त्यामुळे या भेटीत नाराजी दूर झाली का अशी चर्चा आहे. त्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाते की इतर कोणत्या ठिकाणी त्यांची वर्णी लावली जाते हा ओत्युक्याचा विषय आहे.