इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
युती विचारांची, विश्वासाची, विकासाची म्हणत शिवसेना शिंदे गटाने – डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर युती केल्याची घोषणा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हातात हात घेत सर्वांना अभिवादन केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने दलित, मराठी मतांसाठी गणिताची जुळवाजुळव केली असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल टाकले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचेही जाहीर केले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा असलेले आनंदराज आंबेडकर आहेत. दलित, पीडित, शोषितांसाठी ते काम करत आहेत. विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवशक्ती – भीमशक्ती अशी युती केली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.