इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि मोहसीन शेख यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
ठाकरे गटाचे माजी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, ५ तालुकाप्रमुख, १ शहरप्रमुख, विभागप्रमुख आणि त्यांचे सहकारी यांनीदेखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच ठाणे शहरातील रामचंद्र नगर शाखा क्रमांक २३ चे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे व अनेक गटप्रमुख, उप-शाखाप्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आज शिवसेनेचा वर्धापन दिन असून हा दिवस आपल्याला भव्यदिव्य पध्दतीने साजरा करायचा आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले आहेत. आजच्या दिवशीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहेत ही आनंदाची बाब आहे. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची ही पोचपावती असून त्यामुळेच आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येऊन दाखल होत असल्याचे मत याप्रसंगी शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेवक शरद कणसे, माजी नगरसेवक किरण लांडगे, युवासेना अधिकारी प्रयाग लांडे, ऋषीकेश माने तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.