नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर शिवसेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवार १५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार असून ही बैठक मंत्री दादा भुसे यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानावर होणार आहे. नाशिक महापालिकेच्या सर्व प्रभागांतील शाखा प्रमुख ते शहर पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छूक उमेदवार या बैठकील उपस्थित राहणार आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहे. त्यात शिंदे गटाची अजून बांधणी ठाकरे सेनेच्या तुलनेत नाशिकमध्ये कमी आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटात गटबाजीच्या बातम्या अधून मधून येत असतात. त्यामुळे ही बैठक थेट मुंबईला घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक महानगरपालिकेत निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. पण, भाजपची नाशिकमध्ये मोठी पकड असून त्यांनी याअगोदही स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक भाजप नाशिकमध्ये महायुती म्हणून लढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या बैठकीत या विषयावरही चर्चा होते की नाही. हे बैठकीनंतर समोर येणार आहे.
